Login

"काय माझा गुन्हा...?" भाग १९

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग १९


गौरवी कॉलेजच्या गेटजवळ क्षणभर थांबली…
समोर उभी असलेली कॉलेजची कमान तिच्याकडे एखाद्या नव्या जगाचं दार उघडत असल्यासारखी वाटत होती...

इंग्रजांच्या काळात जुन्या दगडी बांधकामाची ती कमान, काळाच्या ओघात थोडी झिजलेली, पण अजूनही ताठ उभी जणू हजारो स्वप्नांचा भार पेलत होती...

कमानीवर कोरलेल्या अक्षरांत कॉलेजचं नाव लिहिलेलं होतं; ती अक्षरं उन्हाच्या प्रकाशात चमकत होती आणि तिच्या डोळ्यांत नकळत आशेचा उजेड उतरवत होती...

गेटच्या आतून विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती... कोणी हसत होते..., कोणी घाईघाईत चालत होते..., कोणी आनंदाने डोळे मोठे करून कॉलेजची इमारत पाहत उभे होते...,  तर कोणी पहिल्याच दिवसाच्या थोड्याशा भीतीसह इकडे तिकडे पाहत उभे होते...

पानगळ झालेल्या झाडांखालून पायवाट आत वळत होती, जणू प्रत्येक पाऊल नवीन अनुभवांकडे घेऊन जाणार होतं...

गौरवीने एक खोल श्वास घेतला... ही फक्त इमारत नव्हती…
इथूनच तिची स्वप्नं आकार घेणार होती, तिचं अस्तित्व स्वतःची ओळख शोधणार होतं...

त्या कमानीखालून आत पाऊल टाकताना, ती आनंदाने पण नकळत स्वतःशीच पुटपुटली...
“इथूनच माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे…”

कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच गौरवीला जाणवलं...
ही जागा जितकी स्वप्नांनी भरलेली आहे, तितकीच नवख्यांसाठी  मात्र कठीण आहे...

नवीन विद्यार्थ्यांचे घोळके इथे-तिथे उभे होते ...
कुणाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, तर कुणाच्या डोळ्यांत दडलेली भीती होती...

आणि तेवढ्यात एक आवाज आला… 
"ए फ्रेशी… इकडे ये जरा!" 
तो आवाज थोडासा उद्धट, थोडासा मग्रूर होता... 

गौरवी वळून पाहते... समोर एक हॅन्डसम मुलगा उभा होता... उंच, रुबाबदार, पण चेहऱ्यावर उपहासाचं हसू होत...
त्याच नाव होतं... माधव...
आणि त्याच्या भोवती ३-४ मित्र हसत, चेष्टा करत उभे होते...

गौरवी त्याच्याकडे आपली पावले वळवते... आणि शांतपणे माधवच्या समोर जाऊन उभी राहते...

"नाव काय तुझं...?" माधवने विचारलं...

"गौरवी," ती शांतपणे म्हणाली...

"ओहो… शांत दिसतेस... मग आम्ही सांगतो ते ऐकायचं आणि पहिलं टास्क पूर्ण करायचे... चल इथल्या सगळ्या सीनियर्सना वाकून नमस्कार कर...  आणि स्वतःला 'आमची गुलाम' म्हण..." 

आसपासचे फ्रेशर्स मान खाली घालून उभे होते...
कुणाच्या डोळ्यांत पाणी होते, तर कुणाच्या ओठांवर थरथर होती...

गौरवी मात्र सरळ ताठ मानेने उभी राहिली होती.‌..
आणि मग ती हसली... तीचं हसू ठाम होते...

गौरवीचे ते हसू पाहून क्षणभर तिथे शांतता पसरली होती…  आता काय होणार हे ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."